IMD Rain Alert : राज्यात आता मान्सूनने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. आज 1 जुलै रोजी मुंबई, पुणेसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आता उद्यापासून (2 जुलै) पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाने 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस कोकणात सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहणार आहे. तर पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर 2 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर,सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
तर मराठवाड्यातील संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव, नाशिक, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे.
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; 6 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित-
विदर्भात पावसाचा जोर वाढणार
तर दुसरीकडे हवामान विभागाच्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.
