नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज महत्वाचा निकाल हाती येणार आहे. दरम्यान या सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केला. तर या मुद्द्याला उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी प्रतिवाद केला.
सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर गेल्या तीन दिवसांपासून नियमित सुनावणी झाली. या दोन्ही गटांच्या वकिलांकडून सुनावणीदरम्यान जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही गटाचा युक्तिवाद देखील गुरुवारी पूर्ण झाला. त्यानंतर कोर्ट आता हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करु शकतं. किंवा अंतिम निकाल जाहीर करु शकतं.
दरम्यान 7 सदस्यांचे घटनापीठ नेमण्याच्या बाजूने कौल दिल्यास सत्तासंघर्षांवरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र फेरविचाराची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले, तर अन्य मुद्द्यांवर सुनावणी सुरू राहील. त्यामुळे कोर्ट आज काय निकाल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष या सुनावणीकडे राहणार आहे.