पुणे : आज नोकरी मिळवायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे. साध्या शिपाई पदासाठी शिक्षणाची अट ठेवली जात आहे. जिल्हाधिकारी (Collector) बनण्यासाठी केंद्रीय लोकसवा आयोगाची (UPSC) कठीण परीक्षा पास व्हावी लागते. आणि या कलेक्टरच्या वरती कोण असते तर ते अंगुठा छाप आमदार, खासदार मंडळी येऊन बसतात. मग आमदार, खासदार पदासाठी निवडून येताना शिक्षणाची अट का नसावी, याचा देशातील तमाम विचारवंत, संसद, कायदे मंडळाने करणे गरजेचे आहे, असे मत एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील बोलत होते. जलील म्हणाले की, आमदार, खासदार यांच्या शिक्षणाबाबतचा निर्णय होईल तेव्हा होईल. पण, मला या ६ व्या युवा संसद सभेतून येथे बसलेल्या उच्च शिक्षित तरुणांना आवाहन करायचे आहे. तुम्ही राजकारणात आले पाहिजे तरच या देशाची परिस्थिती बदलू शकते.
पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे या तुम्हा सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहेत. तुम्हाला राजकारणात येताना तुमचे आई-वडील, नातेवाईक म्हणतील की राजकारण हे आपले काम नाही. मात्र, त्यांना तुम्ही माझे उदाहरण द्या. मी २४ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आधी आमदार आणि आता खासदार म्हणून काम करत आहे. माझ्या घरातील कोणीही राजकारणात यापूर्वी नव्हते. त्यामुळे एवढंच म्हणतो की, कोशीस करने वाले की कभी हार नहीं होती… मगर कोशिस करना ही नहीं, ये गलत बात है. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी राजकारणात आले पाहिजे, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी यावेळी केले.