अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?

अवकाळी पावसाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.

News Photo   2026 04 04T200807.929

अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?

राज्यात रब्बी पिकांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. (Weather) हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपीटीने बाधित शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदिली आहे. रब्बी हंगामातील नुकसानीबद्दल माध्यमांशी मंत्री भरणे बोलत होते.

पुढं बोलताना ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तोंडात आलेला घास वाया गेला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच, राज्य सरकार लवकरात लवकर मदत करेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. दरम्यान, कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आवकाळी पावसाचा जोर वाढला; मराठवाड्यात फळबागांसह शेती पिकांचं अतोनात नुकसान

या नुकसानामध्ये विशेषत: केळी, गहू, मका, द्राक्ष, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, डाळींब, कांदा, संत्रा, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसंच, राज्यात फेब्रुवारी-मार्चसह एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १६ जिल्ह्यात पिकांना तडाखा बसला असून एकूण नुकसान २ लाख ४ हजार हेक्टरवर पोहचल्याचे कृषिमंत्री भरणे म्हणाले.

राज्यात अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतीपिकांसह पशुधनाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही भागात जनावरांचे गोठे कोसळले आहे. तर घरावरील पत्रे उडून गेली आहेत. तसेच झाड उन्मळून पडल्याने घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तर वीज पडून शेतकरी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. हे सगळं सुरू असताना कृषिमंत्री भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा दावा केला आहे. राज्यात अवकाळी आणि गारपीटीने नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहेत.

केरलमचे पारंपारिक वाद्य वाजवून आनंद घेत आहेत. राज्यात मात्र शेतकरी मदतीसाठी आशा लावून आहेत. तर कृषिमंत्री मात्र पंचनामे सुरु असून लवकरात लवकर मदत दिली जाईल, असे कोरडे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत, अशी टीका शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांकडून केली जात आहे. यामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची गरज असते. परंतु कृषी केंद्राकडून खतांचा काळाबाजार सुरु असल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषिमंत्री भरणे यांनी दिला.

Exit mobile version