पुणे : कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आयोजक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती.
कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करतात. त्यामुळं त्यांना चांगल्या मानधनासोबतच निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
राज्य शासनाने राज्य स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीनच्या पदावर, राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग दोनच्या पदावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एकच्या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे बघितले जाते. कुस्ती खेळाला वैभव प्राप्त व्हावे आणि राज्यातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होवून पदक जिकंण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
राज्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचे आयोजन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन खेळाडू उदयास येत आहेत. कुस्ती खेळाडूंनी संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करत असतात. राज्यातील कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून सुमारे 950 कुस्तीपटू सहभागी झाले असल्याची माहिती आयोजक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.