Ladki Bahin Yojana : गेम चेंजर आणि राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत आता बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा मिळत असून आता या योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार , सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचे मूल्यमापन करावे आणि त्यात बदल केले जावे अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने व्यक्त केले आहे.
माहितीनुसार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) लाडकी बहीण योजनेसह 15 राज्यांमधील विविध योजनांतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रोख मदतीच्या रकमेचा वेळोवेळी आढावा घेतला जावा. वाढती महागाई आणि घरगुती खर्चातील बदल लक्षात घेऊन, गरज भासल्यास या रोख रकमेत वाढ करावी, अशी शिफारस केली आहे.
या अहवालात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्राची ‘माझी लाडकी बहीण‘ योजना आणि ओडिश्याची ‘सुभद्रा’ योजनांचे विश्लेषण केले. या योजनांमुळे महिलांच्या बचतीत वाढ झाली, घरगुती खर्च व्यवस्थापित करण्यास मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात असे सुचवण्यात आले की, रोख मदतीसोबतच महिलांना डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. याचबरोबर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना स्वयं- सहायता गटांशी जोडले पाहिजे असं देखील या अहवालात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या मते, 15 राज्यांमधील महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट रोख मदत जमा केली जात आहे, ज्याचा लाभ सुमारे 12 कोटी महिलांना होत आहे. महिलांना थेट आर्थिक मदत दिल्याने कुटुंबाची स्थिती सुधारते आणि महिलांचा आर्थिक सहभाग वाढतो, असे परिषदेचे मत आहे. त्यामुळे, महागाईनुसार या मदतीच्या रकमेचा वेळोवेळी आढावा घेतला जावा.
पवना धरण 55 टक्के भरले पण वीज खंडित झाल्याने पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा विस्कळीत-
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना 1500 च्या जागी 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. तर आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारशीनंतर या योजनेतील हप्ता लवकरच वाढवला जाईल असे संकेत मिळत आहे.
