मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा काल महाराष्ट्रात कार्यक्रम पार पडला. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आम्हाला संपूर्ण भारताला प्रभू रामाचा भारत बनवायचं आहे. अखंड भारताला राममय करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत आणि भारत हिंदू राष्ट्र बनूनच राहणार राहणार.
ते म्हणाले, मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मी फक्त रामाबद्दलच बोलणार आहे. आपण फक्त राम जाणतो, सीता जाणतो आणि त्यांचीच स्तुती करतो आणि बाबा आपल्याला आशीर्वाद देतात. पण मुंबईकरांना एक आवाहन आहे की, पुढच्या वेळी आल्यावर संपूर्ण महाराष्ट्र राममय झाला पाहिजे. तुमच्यापैकी कोणाला राममय वातावरण हवं असेल तर माझ्या पाठीशी उभे रहा. कारण, आपल्या या देशाला रामाचा भारत बनवायचं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलं की, भारत हा हिंदू राष्ट्र राहील. हा देश हिंदूचा देश आहे. हा देश प्रभू रामाचा आहे. त्यामुळं इतर लोक काय म्हणतात, त्यामध्ये पडू नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे कच्चे असतात तेच बोलतात. आम्हाला बालाजीचा आशीर्वाद आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्हाला संपूर्ण भारताला रामाचा भारत बनवायचं आहे. मला माहिती आहे लोक मला सोडणार नाहीत, पण आम्ही देखील त्यांना सोडणार नाही. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आई म्हणत मुंबईला जाऊ नको, तिला विचारलं का नको जायाला ? तर ती म्हणाली होती की, तिथं गेल्यावर वाद होतील. मग तुला त्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतील. पण, आम्ही घाबरणारे नाहीत, असं पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं.
शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक
यावेळी बोलतांना त्यांनी महाराष्ट्र हा संतांचा देश आहे, असं सांगितलं. ते म्हणाले, जो काही महिमा आहे तो बागेश्वर बाबांचा महिमा आहे. तुमच्या जीवनात संकट आले तर काळजी करू नका, आता तुमच्या जीवनात बागेश्वर बाबा आहेत. हा देश तांत्रिकांपासून लोकांपासून दूर व्हावा हाच आमचा उद्देश आहे. आता ठिकठिकाणी भटकण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात संकट येईल तेव्हा बालाजीचा दूत तुम्हाला वाचवण्यासाठी येईल. लोकांनी आमची परीक्षा घेतली, पण कोणाला काही मिळाले नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांनी तुम्हालाही मदत करावी अशी आमची इच्छा आहे. तुम्ही सर्व आमचे कुटुंब आहात. आजपासून मुंबईतील लोक एकतर बालाजीवर विश्वास ठेवतील नाहीतर सर्व काही बालाजीवर सोडून देतील, असं ते म्हणाले.
धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याविषयी काही वादग्रस्त विधान केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात संतापाची लाट होती. तरीही त्यांचा कार्यक्रम मुंबईत घेण्यात आला.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबत अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, आम्ही धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर जादूटोनाविरोधी कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी नागपुरातल्या कार्यक्रात या कायद्याची पायमल्ली केली. वैद्यकीय पदवी नसतांना एखाद्याने कुणावर तरी उपचार करण्याचा दावा केला तरी ती या कायद्याची पायमल्ली आहे. या दोन गोष्टीमुळं शास्त्री यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.