सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा वाऱ्याने उन्मळून पडला. खरंतर अखंड महाराष्ट्राचे दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी अवस्था होणे ही शरमेचीच गोष्ट म्हणायला हवी. हा पुतळा पडल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. हा पुतळा किती घाई-गडबडीत बनवला गेला, तीन ते चार महिन्यांमध्ये कसा पुतळा तयार करवून घेतला, कसा नवख्या शिल्पकाराकडून बनवून घेण्यात आला अशा अनेक गोष्टी माध्यमांमधून पुढे येत आहेत. हा पुतळा पडल्यानंतर संबंधित शिल्पकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील पहिला अश्वारुढ पुतळा बनविण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली होती. पुण्यात ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या आवारात उभारण्यात आलेला हा पुतळा जागतिक किर्तीच्या शिल्पकाराकडून बनवून घेण्यात आला होता. या शिल्पकारांनाही हा पुतळा बनवण्यासाठी केलेली साधना, घेतलेले प्रयत्न हे कौतुकास्पद होते. (It took seven years to make the first equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj in the country.)
नेमका काय आहे या पुतळ्यामागील इतिहास आणि कोण होते हे जागतिक दर्जाचे शिल्पकार आणि त्यांनी कशी मेहनत घेतली होती? पाहुया सविस्तर…
पद्मश्री विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर हे नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नाही. पण ते जागतिक दर्जाचे शिल्पकार होते. करमरकरांचा जन्म 2 ऑक्टोबर 1891 साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सासवणे इथे झाला होता. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी 1908 साली काढलेले अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तत्कालिन कुलाबा जिल्ह्याचे कलारसिक उपजिल्हाधिकारी ऑटो रॉथफील्ड यांनी पाहिले. ते त्यांना इतके आवडले की त्यांनी कुमारवयीन नानासाहेबांची कलेची खोली चाचपण्यासाठी एका छायाचित्रानुसार ग्रीक अर्धशिल्प बनवून घेतले. ते इतके हुबेहुब होते की या मुलाला जर शिल्पकलेचे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले तर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिल्पकार बनेल असा विश्वास रॉथफील्ड यांना वाटला.
नानासाहेबांचे शालेय शिक्षण संपल्यानतर 1910 साली रॉथफील्ड यांनी नानासाहेबांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिष्यवृत्ती देऊन दाखल केले. तीन वर्षांच्या प्रशिक्षण काळात त्यांनी अनेक शिल्परचना केल्या. त्यातील ‘माकड आणि त्याने जवळ घेतलेले पिल्लू’ या शिल्परचनेस प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो पदक’ही भेटले. प्रशिक्षण घेऊन आल्यावर सासवणेमध्ये त्यांनी चक्क आपल्या वडिलांचे शिल्प बनवले आणि सर्वांना थक्क केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मित्रपरिवाराची अनेक नमुना शिल्पे बनवली. रॉथफिल्ड यांचंही त्यांनी शिल्प बनविलं. साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे सुरेंद्रनाथ टागोर यांनी आपल्या मुलीचं आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचं शिल्प घडवण्याचं काम दिलं. अल्पावधीत त्यांनी ती शिल्प तयार केली. यानंतर त्यांच्या जीवनला एक वेगळी दिशा मिळाली. तिथून नानासाहेबांचा नवीन प्रवास सुरु झाला.
सुरेंद्रनाथ टागोर यांच्या आग्रहावरुन 1917 साली नानासाहेबांनी कलकत्ता येथे स्टुडिओ थाटला. तिथेच गोगलगायीवर बसलेल्या नग्न अंध युवतीचे शिल्प तयार केले. त्या शिल्पाला 1916 च्या डिसेंबरमध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्यपदकाचा बहुमान प्राप्त झाला होता. नानासाहेबांची कला आणि किर्ती जगात ओळख मिळवत होती. याच दरम्यान, पुण्याच्या ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’च्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारुढ पुतळा उभा करण्याची कल्पना राजर्षि शाहू महाराजांना सुचली. राजाराम महाराज छत्रपती यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. 1920 साली राजाराम महाराजांनी पुतळा बनवण्याचं काम नानासाहेब करमरकर यांना दिलं. पुतळ्याचं प्रत्यक्ष काम सुरू करण्यापुर्वी नानासाहेबांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. शिवरायांची सतेज करारी नजर, मुठीत आवळून धरलेल्या तलवारीचं वर्णन त्यांनी विविध ग्रंथातून वाचलं. शिवाजी महाराजांच्या घोड्याचा रूबाबही त्यांनी वाचला.
त्यानंतर 1921 मध्ये पुतळ्याच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली. मुंबईतल्या माकेंझी अॅण्ड मॅजेनॉन कंपनीच्या फौन्ड्रीत हे काम सुरु होते. घोडयाचा रूबाब वाचला तसाच असला पाहिजे हा नानासाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी ‘शहनवाझ’ नावाचा रूबाबदार घोडा कोल्हापूरहून मुंबईला आणला गेला. मग हुबेहुब घोडा तयार झाला. अखेरीस 1928 मध्ये हे काम पूर्ण झाले. म्हणजे पुतळा तयार करण्यासाठी नानासाहेबांना तब्बल 7 वर्षे लागली. आठ टन ब्रॉन्झची ही मूर्ती तयार झाली. हा पुतळा तयार करताना नानासाहेबांनी त्यात आपला जीव ओतला. कठोर मेहनत, कामावरील निष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील निस्सीम प्रेम, भक्ती यातून हे जगविख्यात शिल्प आकारास आले.. एकसंध ओतकामातून आकारास आलेले हे पहिले शिल्प. शिल्पकला क्षेत्रातील हा विक्रमच होता. या पुतळ्याचं अनावरण बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लेसली लुईस यांच्या हस्ते झालं.. हातात तलवार घेतलेले आणि घोड्यावर आरूढ झालेले शिवाजी महाराज सजीव आहेत असा आभास व्हावा असा हा पुतळा होता. देशभर या पुतळ्याचे कौतूक झालं. आज 100 वर्षांच्या उंबरठ्यावर असलेला हा पुतळा दिमाखात आणि जसा आहे तसाच उभा आहे.