Jan Aakrosh Morcha in Chhatrapati Sambhajinagar : मस्साजोग आणि परभणी येथील घटनांच्या निषेधार्थ आज रविवार, (दि. १९ जानेवारी) रोजी सकल मराठा समाजातर्फे जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. (Aakrosh Morcha) प्रा. चंद्रकांत भराट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती. या मोर्चासाठी जिल्हाभरातूनच नाही तर राज्यातून लोक येणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त प्रशासनाकडून तैनात करण्यात आला आहे.
मोर्चा सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सुरू होऊन विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात सर्व जाती, धर्म आणि पक्षांच्या संघटना सहभागी होणार असून, पीडित देशमुख व सूर्यवंशी कुटुंबीयांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत माणुसकीच्या नात्याने मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगेंनी बोलतांना काळजी घ्यावी..मराठा क्रांती मोर्चाकडून सल्ला
मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, निराला बाजार मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार असून, सर्वात पुढे बॅनर, त्यामागे धर्मगुरू, महिला आणि पुरुष अशी रचना असेल. मोर्चेकऱ्यांनी स्वतःची भाकरी व पाणी घेऊन यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. निषेधार्थ काळे कपडे परिधान करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
उपस्थितांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसंच या घटनेतील सर्व दोषींना, मग ते पोलीस असोत किंवा इतर कोणीही, कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचं कुटुंबही आज या मोर्चात सहभागी होणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे, भाजप आमदार सुरेश धस हे मान्यवरही येणार आहेत.