मुंबई : पुढील 48 तासांत ठाण्याचे पोलिस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं आम्ही समजू असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना जयंत पाटलांनी ठाण्यात रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाचा निषेध केला आहे. या प्रकरणी बोलताना जयंत पाटील सत्ताधारी सरकारवर चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अधिकारांतर्गत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता त्यांनी फडणीसांना थेट आव्हानच दिलं आहे.
फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले
आज किंवा उद्यापर्यंत किंवा पुढील ४८ तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहाराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली करावी, असं केलं तरंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम असल्याचं आम्ही समजणार असल्याचं ते म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांनी जर असं केलं तरच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
लोंढे म्हणाले, देशमुखांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे तत्काळ ठाण्यात दाखल होत त्यांनी रोशनी शिंदे यांची सपत्नीक भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत त्यांचा फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केला आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी थेट फडणवीसांना आव्हान देत धारेवर धरलं आहे.
दरम्यान, जयंत पाटलांच्या आव्हानंतर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेणार? पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा बदली करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.