आमदाराची बायको संपादकाना फोन (Beed) करून धमकी देते, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून ती कोणत्या आमदाराची बायको आहे हे पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सांगावं, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा आता रंगली आहे. दूध भेसळ मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांनी लेट्सअप मराठीचा दाखला देत संपादकांना आलेल्या धमकीचा निषेध करत त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर त्यांनी दूध भेसळ प्रकरणावर जी मिटींग झाली त्यावरही भाष्य केलं. दरम्यान, राज्यातील दूध भेसळीविरोधात कडक कारवाई सुरु असतानाच पुणे जिल्ह्यातील एका दूध पावडर तयार करणाऱ्या प्लांट चालकाला भेसळयुक्त दूध स्वीकारण्यासाठी बीडमधील एका बड्या नेत्याच्या पत्नीने फोनवरून दमदाटी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यावरून अनेक माध्यमांनी बातम्या केल्या. त्याच भूमिकेतून लेट्सअप मराठी या माध्यमानेही बातमी केली होती.
छत्रपती संभाजीनगर विभागासह दूध भेसळीविरोधात लातूरमध्येही मोठी कारवाई, राज्यभर ४.६३ कोटींचा साठा नष्ट
संबंधित प्लांट चालकाने सुरुवातीला हे दूध नाकारले होते. मात्र, कथित दबावानंतर ते दूध स्वीकारावे लागले असल्याचे देखील बोलले जात आहे असा दावा लेट्सअप मराठीने आपल्या बातमीत केला आहे. त्यामध्ये थेट कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. तरीही काही लोकांनी धमक्या दिल्याने या बातमीची आज महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दखल घेत त्याचा उल्लेख केला. तसंच, या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही केली आहे. आता या प्रकरणाची पुढं काही चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर, आंबेगाव परिसरातील एका दूध पावडर प्लांट चालकाने दुधाचा टँकर दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी केली. यात संबंधित दूध निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने प्लांट चालकाने ते स्वीकारण्यास नकार दिला. पण हा टँकर बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्याशी संबंधित होता. बीडमध्ये या नेत्यांचे गोठे आहेत. इथला सर्व दूध व्यवसायाचे संचलन त्यांची पत्नी करते अशी माहिती आहे.
