Download App

संतापजनक! कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; चालकालाही काळे फासले

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.

Karnataka News : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमच धगधगता राहिला आहे. मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून त्याला दाद दिली जात आहे. उलट मराठी भाषिकांना त्रास देण्याचेच उद्योग कर्नाटक सरकार आणि कन्नडिगांकडून केले जातात. आताही एक संतापजनक बातमी आली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले. इतकेच नाही तर चालकाला मारहाणही करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बस चालकाला काळे फासल्याची माहिती मिळाली आहे.

बस चालकाला कार्यकर्त्यांनी कन्नड येते का अशी विचारणा केली. परंतु, चालकाला कन्नड येत नसल्याचे लक्षात येताच या लोकांनी त्याच्या तोंडाला काळे फासले. शिवाय बसला देखील काळे फासले. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सीमावादावर आजचा कर्नाटक सरकार विरोधातला संपूर्ण ठराव वाचा

महाराष्ट्रात शिवसेनेने बेळगावचा मुद्दा लावून धरला आहे. याआधी सुद्धा अनेकदा महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले झाले आहेत. 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर मोठा हल्ला केला होता. दगडफेकीत बस आणि ट्रकच्या काचा फुटल्या होत्या. वाहनांच्या नंबर प्लेटची तोडफोड केली होती.

कर्नाटकचा सीमाभाग असलेल्या बेळगावात मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. हा भाग कर्नाटकात येतो. भाषावार प्रांतरचनेचा विचार केला तर हा भाग महाराष्ट्रात येण्याची गरज होती. येथील रहिवाशांचीही महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. यासाठी मराठी भाषिकांनी अनेक आंदोलनेही केली. पण कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय ताकदीच्या जोरावर आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला.

बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; आदित्य ठाकरेंची CM फडणवीसांकडे मागणी

महाराष्ट्र सरकारचा ठराव

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला होता. यामध्ये “नोव्हेंबर १९५६ मध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव (चंदगड तालुका वगळून) विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सुत्रानुसार फेररचनेची मागणी केली आणि कर्नाटकातील ८६५ सीमावादीत गावांवर दावा सांगितला आहे.” असे म्हटले आहे.

follow us