Kiran Kale warns of action against those who betray the party : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठाच्या काही उमेदवारांबाबत मोठ्या घडामोडी घडल्या. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसंदर्भात गैरप्रकार, ऐनवेळी अर्ज माघारी आणि दबावाचे आरोप यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक 16 ‘ब’ मधून सुनिता संजय कोतकर यांनी शिवसेना उबाठा(Shivsena UBT) आणि शिंदेंच्या शिवसेनेचा(Shivsena) एबी फॉर्म लावत अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी शिवसेना उबाठाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
तसेच, प्रभाग क्रमांक 11 ‘ड’ मधून भाजपचे माजी नगरसेवक भैय्या परदेशी यांचे सख्खे बंधू कल्पेश परदेशी यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाचा एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अर्ज मागे घेतला. या प्रकाराला पक्षाने गद्दारी ठरवत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील गौरव ढोणे यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून राहिल्यानंतर अखेर मागे घेण्यात आला. याबाबत स्पष्टीकरण देताना शिवसेना उबठाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी सांगितले की, ढोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाने दिलेला एबी फॉर्म जोडलेलाच नव्हता. छानणीनंतर अपक्ष म्हणून नाव समोर आल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता, पोच पावतीवर ढोणे आणि निर्णय अधिकारी यांची सही आढळून आली. मात्र, त्यात एबी फॉर्म, शौचालयाचा दाखला तसेच ना-देय प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. ही कागदपत्रे 31 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
Video : पुण्यात भाजपचं 125 मिशन कसं फत्ते करणार?, शहराध्यक्ष घाटेंनी सांगितलं गणित
यावरून गौरव ढोणे यांनी जाणीवपूर्वक एबी फॉर्म न जोडता ही बाब पक्षापासून लपवून ठेवली आणि विचारणा केल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किरण काळे यांनी केला. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. किरण काळे यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्षांकडून शिवसेना उबाठाच्या अनेक उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्तेचा गैरवापर करत मोठ्या रकमेची आमिषे दाखवण्यात आली. मात्र, प्रामाणिक शिवसैनिक विकले गेले नाहीत, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेना उबाठाच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी एकाही जागेवर विरोधी पक्षाचा उमेदवार बिनविरोध झालेला नाही. तसेच, महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांच्या विरोधात घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे चार आणि काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवारांचे अर्ज माघारीनंतरही शिल्लक आहेत. या संदर्भात दोन्ही पक्षांशी चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल, असेही किरण काळे यांनी सांगितले.
