Download App

Amit Shah : मोदींच्या नावाने मते मागितली, सत्ता मिळाल्यावर पवारांच्या पायात जाऊन पडले !

Amit Shah vs Uddhav Thackeray : निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नावाने मते मागितली. सत्ता मिळाल्यानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले. पक्ष कोणता मोठा होता हे सर्वांनाच माहिती होते. मात्र,आता परिस्थिती बदलली आहे. खरी शिवसेना (Shivsena) धनुष्यबाणासह भाजपबरोबर (BJP) आली आहे. आता आम्हाला बहुमत नको आहे तर संपूर्ण विजय पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व 48 जागा पंतप्रधान मोदींच्या झोळीत टाका, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले. कोल्हापुरात आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

शहा यांनी उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. ठाकरेंनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, अमित शहांनी वचन दिले होते. युती तुम्ही तोडली मी नाही. आम्ही एकटे लढलो आणि जिंकलो सुद्धा. यावर शहा म्हणाले, की निवडणुकीत मोदींचे फोटो मोठे होते. बरोबर उद्धव ठाकरेंचे छोटे फोटो होते. निवडणुकीत मोदींच्या नावाने मते मागितली. पण सत्ता मिळाल्यावर मात्र शरद पवारांच्या (Sharad Pawar) पायात जाऊन पडले. आम्हाला सत्तेचा मोह कधीच नव्हता. घोटाळे करणारे आज कुणीही आमच्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची कुणाचीही हिंमत नाही,असे शहा म्हणाले. राज्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूरला एनडीएचा बालेकिल्ला बनविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात

विरोधी पक्षांवर टीका करताना शहा म्हणाले, की विरोधी पक्ष म्हणायचे काश्मीरमधील कलम ३७० हटवू नका. आम्ही विचारले का हटवायला नको तर ते म्हणाले, की काश्मीरमध्ये रक्तपात होईल. पण, रक्तपात तर सोडाच साधा दगडही फेकला गेला नाही. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली. त्यामुळे देशभरात संदेश गेला की भारताच्या सुरक्षेबरोबर छेडछाड करणे सोपे राहिलेले नाही. मोदींनी एका झटक्यात ट्रिपल तलाक संपवला. आता देशातील भाजप सरकारे समान नागरी कायद्याच्या दिशेने पुढे निघाली असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदीर होणेही या देशात अशक्य वाटत होते. मात्र, मोदींनी 2019 मध्ये रामजन्मभुमीवर शिलान्यास केला. आता हे मंदिर थोड्याच दिवसात पूर्ण होईल. देशात मागील सत्तर वर्षात राहिलेली कामे मोदींनी फक्त पाच वर्षात पूर्ण केली, असे शहा म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज