Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी असल्याचे बोलले जात आहे. किरण सामंतर पक्षात नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.
याआधीही त्यांनी नाराज असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाचे स्टेटस ठेवले होते. जो होगा देखा जाएगा, असा संदेशही लिहिला होता. त्यावेळीच त्यांनी बंडाची तयारी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर दबाव वाढला. बंधू उदय सामंत यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांनी माघार घेतली होती. याचा खुलासा किरण सामंत यांनीच केला होता.
Uday Samant : ‘शरद पवार गटाला नवा ज्योतिषी मिळाला’ आव्हाडांच्या वक्तव्यावर सामंतांचा खोचक टोला
परंतु, आता लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना त्यांनी पुन्हा बंडाची तयारी केली आहे. रत्नागिरी मतदारसंघातून ते स्वतः इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे दावा करत आहेत. यासाठी भाजपकडूनही मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला जात आहे. या घडामोडींचा अंदाज आल्याने किरण सामंत यांनी बंडाची तयारी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची भेट घेत त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. त्यांच्या या हालचालींनंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होतील. चार महिन्यांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी किरण सामंत यांनी माघार घेतली होती. आता पुन्हा ते माघार घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दबदबा आहे. 2009 मध्ये नीलेश राणे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. त्यांना 3 लाख 53 हजार 915 मते मिळाली होती. त्यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. सलग दोन निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. या राजकीय समीकरणाचा विचार करूनच किरण सामंत यांनी महाविकास आघाडीशी जवळीक वाढवल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?