Download App

रत्नागिरीमध्ये बर्निंग बस! मुंबईहून निघालेली लक्झरी बस जळून खाक; प्रवासी बचावले

रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.

Ratnagiri Bus Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष हे देखील अपघातांमागचं मोठं कारण आहे. रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसला आग लागली त्यावेळी या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. दरम्यान, बसमधील प्रवासी गणेशोत्सवासाठी कोकणात त्यांच्या गावी निघाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माहितीनुसार, खासगी बस मुंबईहून मालवणच्या दिशेने निघाली होती. गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे. कोकणात गणेशोत्सवाची वेगळीच क्रेझ आहे. येथे घराघरात अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तेव्हा या उत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी माणसं कोकणात त्यांच्या गावी निघाली आहेत. खासगी बसमधील प्रवासी देखील गणेशोत्सवासाठी कोकणातील त्यांच्या गावी निघाल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसात भरधाव थारची रिक्षाला धडक! 5 जणांचा जागीच मृत्यू, चिपळूणमध्ये भीषण अपघात

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बस रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. बसचालकाच्या लगेचच लक्षात आले. त्याने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला घेतली आणि तत्काळ प्रवाशांना खाली उतरवलं. त्याच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात कुणीही जखमी झालं नाही. मात्र बसचा पूर्ण कोळसा झाला. बसमधील प्रवाशांचे विविध साहित्य देखील जळून खाक झाले.

या घटनेची माहिती मिळताच खेड महापालिकेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. मात्र तोपर्यंत बस पूर्ण जळून गेली होती. प्रवाशांना अन्य वाहने उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्यात आले. बसला आग कशामुळे लागली याचे उत्तर अजून मिळालेले नाही. मात्र या घटनेत बसचालकाने जे प्रसंगावधान दाखवले त्यामुळे प्रवाशांचे जीव वाचले.

भाविकांवर काळाचा घाला! पिकअप अन् ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

follow us