Vadhavan Port Project 2024 : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections 2024) होणार आहे. या निवडणुकांची तयारीने वेग घेतला आहे. त्यातच राज्य आणि केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी अनेक (Maharashtra) प्रकल्प आणि योजनांना मंजुरी दिली जात आहे. या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की पालघर येथे तयार होणारा मेगा प्रोजेक्ट वाढवण पोर्ट (Vadhavan Port Project) अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जवळपास 12 लाख रोजगार उपलब्ध होतील. या प्रकल्पात दहा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करून विकसित केला जात आहे. या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे मंत्री सोनोवाल यांनी सांगितले.
पालघर येथील वाढवण बंदर प्रकल्पाच्या शिलान्यास समारंभाती मंत्री सोनोवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जगभरात एक सागरी राष्ट्र म्हणून नाव कमावले आहे. मागील दहा वर्षांच्या काळात सरकारने सागरी क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.
पीएम मोदींनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. तसेच यावेळी पालघरमध्ये 1560 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या 218 मत्स्यपालन योजनांचे देखील उद्घाटन मोदींनी केले होते. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये तीन दिवसांच्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा शुक्रवारी समारोप झाला. मुंबईपासून साधारण दीडशे किलोमीटर दू्र प्रत्येक ऋतूत चालणाऱ्या या योजनेला जून महिन्यात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. यामध्ये तब्बल 76 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
यामध्ये सार्वजनिक आणि खासगी (पीपीपी) मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. मुलभूत सुविधा, टर्मिनल आणि वाणिज्यिक सोयीसुविधांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्र आणि देशातील लोकांना मोठं गिफ्ट आहे असे केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आगामी 25 वर्षांच्या काळात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशात हा प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाढवण पोर्ट प्रकल्पाचा मु्ख्य उद्देश जागतिक स्तरावर एक सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे असा आहे. यामुळे देशातील व्यापार आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ स्थापित करण्यात आला आहे. समु्द्रातील खोल पाण्याच्या ठिकाणी स्थापित केलेल्या देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक अधिक सुलभ होईल. वेळेची बचत होईल आणि खर्चही कमी होणार आहे.
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र अव्वल राहणार, फक्त पालघरला तिसरे विमानतळ उभारा; फडणवीसांची मागणी
मत्स्यपालन क्षेत्रासाठीही काही नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारेही अनेक रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यासाठी 360 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मासे पकडणाऱ्या जहाजांसाठी मुक्त संचार, मदत यंत्रणांची सुरुवात अशा गोष्टींचा विकास केला जाणार आहे. या योजनेंतर्गत 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे आणि मोटर चालित जहाजांवर टप्प्याटप्प्यात एक लाख ट्रान्सपॉन्डर बसवण्यात येणार आहेत.