Lalbaugcha Raja : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलायं. राज्यभरात गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु असून मुंबईच्या लालबाग राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी होत असते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह बडे दिग्गज कलाकार, उद्योजकही हजेरी लावतात. जगभरातील श्रीमंतांच्या यादीतील एक कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबही दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावत असतात. यंदाच्या वर्षी याच अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आलीयं. अनंत अंबानी (Anant Ambani) यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे.
शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तीला दिलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत लालबागचा मंडळाने अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी यांची मानद सदस्यपदी नियुक्ती केलीयं. एक महिन्यापूर्वी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत अंबानी हे रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आहेत.
दरवर्षी अंबानी कुटूंबाकडून मोठी वर्गणी…
अंबानी कुटुंबाच्यावतीने लालबागचा राजा मंडळाला मोठी देणगी दिली जात असल्याची माहिती आहे. अंबानी कुटुंबातील सदस्य भक्तीभावाने गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती मंडळाकडून करण्यात आल्याची चर्चा आहे.
अंबानी कुटूंबाकडून मागील अनेक वर्षांपासून सामाजिक सेवा केली जाते. अंबानी कुटुंबाकडून लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाला रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी मोठं योगदान देण्यात आलंय. रिलायन्स फाऊंडेशकडून 24 डायलिसिस मशीन लालबागचा राजा मंडळाला देण्यात आल्या होत्या. याआधीच्या काळात अनेकदा अंबानी कुटुंबियांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यात हातभार लावल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, देशासह विदेशातही ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अलोट गर्दी होत असते. भाविकांच्या या अलोट गर्दीमुळे लालबागचा राजा मंडळाची प्रतिष्ठाही वाढलीयं. आता नामंकित मंडळाच्या मानद सदस्यपदी नियुक्ती होणे हे देखील प्रतिष्ठेचं मानलं जात आहे. अनंत अंबानी यांच्या या नियुक्तीमुळे लालबागचा राजा मंडळाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढणार यात काही शंका नाही.