विधानपरिषदेची रणधुमाळी! राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपाचा डोळा? इच्छुकांच्या भाऊगर्दीने वाढवली डोकेदुखी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Untitled Design 54

Untitled Design 54

Legislative Council Local Government Elections : अहिल्यानगर- नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांनंतर राज्यात आता पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजले. अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागेवर आता महायुतीधील घटक पक्ष भाजप देखील लक्ष ठेऊन आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील काही इच्छुकांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान इच्छुकांची भाऊगर्दी व राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा डोळा यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगतदार होणार असे दिसते आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अहिल्यानगरमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता, त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये कोणत्या पक्षाचे किती मतदार?

अहिल्यानगर या मतदारसंघात एकूण 461 मतदार असून, कोणत्या पक्षाकडे किती मतदार आहे याची आकडेवारी जाणून घेऊ. भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यसंख्या असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. शिंदेसेनेकडे ४८ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ३५ सदस्य आहे. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. गेल्या वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यावेळी भाजपकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही ही जागा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत नवा ट्विस्ट, शरद पवारांच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण

या उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा

राष्ट्रवादीच्या अजित पवर गटाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे इच्छुक असून त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचे देखील नाव चर्चेत आहे. तर भाजपकडून सुजय विखे सह धनश्री विखे तर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सुजित झावरे यांचे नाव चर्चेत आहे. एकीकडे हे सगळं सुरू असल तरी राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे यांना फडणवीसांनी विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे यामुळे कोणाच्या उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेली असली, तरी भाजपचे वाढते संख्याबळ आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांमुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुजित झावरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version