तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत नवा ट्विस्ट, शरद पवारांच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Rohit Pawar absent from Sharad Pawar’s meeting : राष्ट्रवादी काँगेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा रंगली आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्य यादीवरून पक्षात नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात डावलला जात असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला. त्यामुळे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता समोर आल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, आता शरद शरद पवार यांच्या पक्षात देखोल नाराजीचे सुर उमटत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्वाची बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते सध्या पुण्यात असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण या आलं आहे.
पुण्यात टोळीयुद्ध संपेना! वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या…
रोहित पवार यांच्या नाराजीमागे एक महत्वाचं कारण असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचं कौतुक करत त्यांना क्षमतेचे नेते असे संबोधले. तसेच त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर कसा करून घ्यायचा हे सध्याच्या नेतृत्वाच्या हातात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यामुळे रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कारण रोहित पवार हे सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर टीका करताना दिसले आहेत. अशावेळी शरद पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक करणं, हा संदेश पक्षात वेगळ्या पद्धतीने गेला असल्याचं मानलं जात आहे.
विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रामुख्याने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनाच लक्ष्य करण्यात येत होतं. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेलाही हवा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार जिवंत असते तर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या असत्या, असे दावे त्यांच्या निधनानंतर करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये बैठका झाल्या किंवा नाहीत, यावरूनही आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसलं.
आता आजच्या बैठकीत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते आणि रोहित पवार यांच्या अनुपस्थितीमागचं खरं कारण काय, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.