Lok Sabha Election : महाविकास आघाडीत अजूनही जागवाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात (Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे त्यामुळे धूसफूस वाढली आहे. सांगली, रामटेक आणि भिवंडी मतदारसंघात तणातणी होती. यानंतर उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आक्रमक भूमिका घेत सांगलीत उमेदवार घोषित करून टाकला. ठाकरे गटाची ही भूमिका काँग्रेस नेत्यांच्या (Congress Party) चांगलीच जिव्हारी लागली. आता जर घटकपक्षांनी जागा सोडल्या नाहीत तर मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. राज्यातील सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई, आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडण्यास घटकपक्षांनी नकार दिला तर इंडिया आघाडीतील घटकपक्षांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीसाठी हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे.
Major break: Congress high command has given green signal to Maharashtra Congress for friendly contest against INDIA Alliance partners if the alliance partners refuses to concede the Sangali, Bhiwandi, Mumnai North West, Mumbai South central Lok sabha seats to Congress in state.
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) March 29, 2024
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. सांगली आणि अन्य काही मतदारसंघात ठाकरे गट माघार घेण्यास तयार नाही. सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने कोणतीही चर्चा न करता परस्पर उमेदवार जाहीर केला असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. तसेच भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई या काही मतदारसंघात जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेस नेते अस्वस्थ झाले आहेत. हा वाद थेट काँँग्रेस हायकमांडपर्यत पोहोचला आहे. त्यानंतर आता सांगली, भिवंडीसारख्या अन्य 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसचे नेते पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या जागांवर लढण्यास ठाम आहेत. या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायच्या नाहीत असा काँग्रेसचा पवित्रा आहे. या जागांवर लढण्याची तयारी काँँग्रेसने केली आहे. यावरून आघाडीतील धुसफूस जास्तत वाढल्याचे दिसून येत आहे. याआधी ठाकरे गटाने जेव्हा 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यावेळीही काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत आमच्याकडून आता जागावाटपाची चर्चा संपली आहे. आणखी किती काळ चर्चा करायची, असा सवाल विचारला होता.
दरम्यान, काँग्रेसने जर खरंच मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार दिले तर मतविभाजन होऊन त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल. महायुतीला याचा फायदा मिळेल अशा शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात यावर पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे. सध्या तरी काँग्रेस लवकर माघार घेईल अशी शक्यता दिसत नाही.
कोल्हापूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असताना या जागा काँग्रेसला सोडल्या होत्या. तर विदर्भातील अमरावतीची जागाही काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. त्यामळे निदान पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मतदारसंघ मिळावा असा आग्रह ठाकरे गटाने धरला होता. परंतु, सांगली मतदारसंघ सोडण्याच्या मानसिकतेत काँग्रेस पक्ष नव्हता.