ग्रामीण महाराष्ट्राचा कौल भाजपच्या बाजूने; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
What does the exit poll for the Zilla Parishad election say? : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदांच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक झाली असून, एकूण 7438 उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत होते. मतदानानंतर आता समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
एकूण 731 जिल्हा परिषद जागांपैकी भाजप 263 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं एक्झिट पोल सांगतो. शिवसेनेला 156 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 118 जागा मिळू शकतात. काँग्रेस 61 जागांवर समाधान मानू शकते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 48 जागा मिळतील, असा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला 42 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर इतर आणि अपक्ष उमेदवारांना 37 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पैसे वाटून मतदान करून घ्या; माजी मंत्री तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
या निवडणुकीत विशेष लक्ष वेधून घेतली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी केलेली युती. अजित पवार आणि शरद पवार गटाने एकत्र येत निवडणूक लढवली असली, तरी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार त्याचा फारसा फायदा झाल्याचं चित्र दिसत नाही. उलटपक्षी, भाजपने स्वतंत्रपणे लढत ग्रामीण भागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचं संकेत मिळत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली असून काही पारंपरिक गड राखण्यात यश मिळालं असलं, तरी एकूणच बहुमतासाठी त्यांची संख्या अपुरी ठरत असल्याचं एक्झिट पोल दर्शवतो.
दरम्यान, हा एक्झिट पोल केवळ अंदाज असून अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीवरून भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.
