काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ टीका अन् खासदार पंतप्रधानांना भेटणार; सुप्रिया सुळेंनी दोन्ही विषयावर काय दिली प्रतिक्रिया?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले.

News Photo   2026 08 08T180545.401

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या आक्षेपार्ह टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसने केलेले वक्तव्य अयोग्य होते, असे सुळे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली असून, त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या स्थानिक माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून हा प्रकार घडला असून, ते काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मत नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या भूमिकेत फरक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणाचाही अपमान होईल, अशा प्रकारची वक्तव्ये कोणीही करू नयेत, असे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या प्रकरणी मोठेपणा दाखविल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले.

काँग्रेसच्या;गुंगी गुडिया; टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट मागण्यात आली आहे. पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते शहरीकरण आणि खासदारांना मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या विकासनिधीच्या अंमलबजावणीतील अडचणी यांसह विकासाशी संबंधित विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य खासदारांना मिळत नसल्याचाही मुद्दा या भेटीत मांडला जाणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्राचे हे सर्व प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ या का?’ या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांनी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता संसदेतील कार्यालयात भेटीसाठी वेळ दिल्याची माहिती सुळे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या खासदारांना नाश्त्यासाठी बोलावण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना नाश्त्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

follow us