मराठी रंगभूमीसाठी नाट्य कला अकादमीची घोषणा; 18 ते 60 वयोगटातील कलाकारांना मिळणार सहा महिन्यांचे प्रशिक्षण

मराठी रंगभूमी दिनानिमित्त आशिष शेलार यांनी नाट्य कला अकादमीची घोषणा केली. १८ ते ६० वयोगटातील कलाकारांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळणार.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ashish Shelar

मुंबई : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्य कला अकादमीची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते नाट्य कला अकादमी दालनाचे उद्घाटन उत्साहात झाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्ञानेश पेंढारकर यांच्या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. य सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत शेडेकर, ज्येष्ठ विश्वस्त शशी प्रभू, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अभिजित भरे आणि मान्यवर रंगकर्मी उपस्थित होते.


सहा महिन्यांचे प्रशिक्षण, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी सांगितले की, अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य कला अकादमी सुरू करण्यात येणार आहे. या अकादमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून 18 ते 60 वयोगटातील प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अंतिमतः या प्रशिक्षणातून नाटकांचे प्रयोग व्हावेत, संहिता आणि प्रयोग यांचा अभ्यास व्हावा, अशा प्रकारची ही कार्यशाळा असेल. प्रशिक्षक असलेल्यांसोबत आजच्या पिढीतील प्रशिक्षकांचाही समावेश करण्यात येईल. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे जतन, नाट्य प्रशिक्षणाचे चालना, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्य क्षेत्रातील विविध कलांचा विकास करणे, या दृष्टीने अकादमी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कलाकार शोधणे, घडवणे आणि रंगभूमीवर स्थान मिळवून देणे हे ध्येय

नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, नाट्य परिषदेचे महत्त्वाचे काम कलाकार शोधणे, कलाकार घडवणे आणि त्यांना रंगभूमीवर स्थान निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे हे आहे. यासाठी रंगभूमीशी संबंधित मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून नाट्य कला अकादमी स्थापन करण्याचे ठरले. त्यानंतर शासनाशी संपर्क साधण्यात आला. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व महसूल विभागांत प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. नाट्य कला अकादमीमध्ये नृत्य, संगीत आणि अभिनय या रंगभूमीच्या सर्व अंगांचे प्रशिक्षण रंगभूमीवरील तज्ज्ञ प्रशिक्षक देतील. यासाठी शासनाचे आभार मानत असल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत शेडेकर यांनी शासनाच्या विविध स्पर्धांमधील ग्रामीण भागातील टॅलेंट अकादमीच्या माध्यमातून कसे पुढे आणता येईल, याचा विचार करावा, असे सुचविले.


मराठी रंगभूमीची 150 वर्षांची समृद्ध परंपरा

मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्य कला अकादमीची घोषणा करण्यात येत आहे. 150 वर्षे रंगभूमी अविरतपणे सुरू आहे. मराठी रंगभूमीने रत्नांना जन्म दिला असून, तिचे नाव जगभरात आहे. मराठी रंगभूमीने फक्त कलाकारच नव्हे, तर नेपथ्य, संगीत इत्यादी सर्व अंगांवर काम करणारे रत्न अभिमानाने उभे केले आहेत. ही कला अकादमी साचेबद्ध नसेल. ज्यांच्यामध्ये गुणवत्तेचा अभाव असेल त्यांच्यात गुणवत्तेचा लोभ निर्माण व्हावा आणि ज्यांच्यात गुणवत्ता असेल त्यांचे पैलू पाडले जावेत. त्या गुणवत्तेतून नाट्यसृष्टीची परंपरा निर्माण होईल आणि त्यातून प्रेक्षकांना समाधान मिळेल.

रंगभूमीवर प्रत्यक्षात काम करत शिकलेले, दुसऱ्यांकडे पाहून शिकलेले आणि स्वतः नावीन्यपूर्ण प्रयोग केलेले असे विविध प्रकारचे कलाकार आहेत. अशा प्रयोगशीलतेतून एक गुणवत्ता विकसित केली आहे. अशा गुणवत्तापूर्ण रंगकर्मींना कला अकादमी स्थापन करून घडविणे ही सुरुवात महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे. याबद्दल अध्यक्ष प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पुढील 100 वर्षांत नाट्यसृष्टी कशी असेल, यावरही चर्चा सत्र घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.

कलावंत घडविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अभिजित भरे यांनी आभार मानले केले. कलावंत घडविण्याची जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू, असे त्यांनी आश्वासित केले.


नाट्य प्रशिक्षणाचे महत्त्व या विषयावर परिसंवाद

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘नाट्य प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात प्रा. मिलिंद इनामदार, अभिनेते अभय कुलकर्णी, अभिनेते सतीश इनामदार आणि दिग्दर्शक बॉबी यांनी सहभाग घेतला. यावेळी नाट्य प्रशिक्षणाची आवश्यकता, व्यावसायिक रंगभूमीतील प्रशिक्षणाचे महत्त्व, नवोदित कलाकारांसमोरील संधी आणि आव्हाने तसेच भविष्यातील नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक कौशल्ये यावर विचार मांडण्यात आले.

follow us