दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार?, सुनिल तटकरे यांनी सांगितली महत्वाची माहिती
तटकरे म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकार, केंद्र सरकारला केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील (Ajit Pawar) मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आम्ही सर्वांनी मिळून अजितदादा यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी विलीनीकरणाची चर्चा आम्ही सखोलपणे करू. येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित असतील. त्यावेळी आम्ही सुनेत्रा पवार यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत नक्कीच चर्चा करू, असं तटकरे म्हणाले. यासह सुनेत्रा पवार दिल्लीमध्येही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्या भेट घेऊ शकतात. आम्ही योग्य वेळेला बसून विलीनीकरणाबाबत चर्चा करू, असंही ते म्हणाले.
अजितदादांच्या अपघाताबद्दल शरद पवारांच्या खासदाराला वेगळीच शंका, काय म्हणाले बजरंग सोनवणे?
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना मी अगोदरपासूनच अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकार, केंद्र सरकारला केली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. अजितदादांचं जाणं धक्कादायक होतं. त्यामुळे या अपघातामागील सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे, अशा भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या.
जे लोक अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करत आहेत, त्यांच्याशीदेखील तपास यंत्रणांनी संपर्क साधावा, अशी मागणी तटकरे यांनी केली. तसेच अजितदादा यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करणारे हे मोठ्या पदावर बसलेले नेते आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडेही विनंती करतो की त्यांनी या नेत्यांकडे असलेली माहिती घ्यावी. कारण राज्यातील जनतेला दुर्दैवी विमान अपघातामागील सत्य लवकरात लवकर समजलेच पाहिजे, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.
