नागपूर : आज महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 हे विधानसभेत बहुमताने संमत झाले. लोकायुक्त विधेयक विधीमंडळात ठेवण्यात आले होते. आज हे विधेयक बहुमतानं मंजुर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. मागील कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नव्हता. आताच्या कायद्यात हा कायदा आणला असल्याचे फडणवीस म्हणाले. आता मुख्यमंत्री देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत.
नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 मांडलं होतं. अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. लोकायुक्त विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा सातत्यानं केला जात होता. या कायद्यामुळं माहिती अधिकारात माहिती घेता येते. तसेच थेट चौकशी आणि कारवाई करता येईल.
लोकायुक्त कायद्यामुळं लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल. सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, असं मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर राज्यातील भ्रष्टाचाराला आणखी ब्रेक लागणार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होऊ शकेल, असा विश्वासही अण्णा हजारे यांनी व्यक्त केला होता.