Download App

Mahadev Jankar : मी आत्महत्या करायला गेलो होतो… पण ‘त्या’ वाक्याने विचार बदलला 

पुणे : मला ९१ टक्के मार्क असूनही एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळाला नाही. कारण कट ऑफ ९१.३ टक्के लागला. अन् तेव्हा धनगर समाज खुल्या प्रवर्गात मोडत होता. मग मी आत्महत्या करायला गेलो होतो. मात्र, शंतनुराव किर्लोस्कर (Shantanurao Kirloskar) यांचे एक वाक्य आठवले की, ‘आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.’ अन् त्यांच्या या एका वाक्याने विचार बदलला. मग मेरीटमधूनच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्यामुळे मित्रांनो मी पैसे देऊन नाही तर मेरीट लिस्टमधूनच इंजिनिअर झालो आहे. मी हे का सांगत आहे. कारण ‘जिस समाज का दल है… उस समाज का बल है, अशा ध्येयाने काम करणारा मी माणूस आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. महादेव जानकर म्हणाले की, मित्रांनाे अपयश आले तर घाबरून जाऊ नका. मी काॅलेजच्या काळात खूप वाचन केले. थाेर राजकारण्यांसह महात्मा फुले, कार्ल मार्क्स, स्वतंत्र्यावीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामायण, महाभारत असे सगळेच वाचून काढले. त्यामुळे आपल्याला नवीन विचार कळतात. त्यातूनच आपल्याला अडचणीतून मार्ग काढता येताे.

कामासाठी भांडत बसू नका. तर काम देणारे बना. मी इंजिनिअर असून मला  पशुसंवर्धन खातं दिले. पण मला अजून हे कळालेले नाही. खासदार, आमदार मंत्री होणे सोप्प नाही. पक्ष सांभाळणे सोप्प नाही. कारण आम्ही एक-एक माणूस निवडून आणतोय अन रामदास तड्स सायंबांचा पक्ष ते पळवून नेत आहे. आम्ही चार-पाच आमदार तरी निवडून आणायला पाहिजे. तेव्हाच हे लोकं आम्हाला घाबरतील.

आज अमेरिका, रशिया, नेदरलँड या देशापेक्षा आपला बुध्यांक (IQ) कमी आहे. त्यामुळे भारतातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार भाजपचे असो काँग्रेसचे काही फरक पडत नाही. पण येथील शिक्षण व्यवस्था बदलणे काळाचीच नाही तर अत्यंत गरजेची झाली आहे, असे देखील महादेव जानकर यावेळी म्हणाले.

Tags

follow us