Mahant Adinath Maharaj of Tarakeshwar fort injured : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात आणि त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत आढळल्यानंतर आदिनाथ महाराज यांना तातडीने अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तारकेश्वर गडाचे महंत म्हणून आदिनाथ महाराज शास्त्री यांना मोठा मान आहे. विशेषतः नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका तसेच बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. त्यामुळे ही घटना समोर येताच त्यांच्या अनुयायांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे तसेच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत महाराजांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
क्रूरतेचा कळस ! कीर्तनकाराचा मुलीला चटके देत अमानुष अत्याचार; गुंजाळला बेड्या ठोकल्या
महाराजांनी स्वतःवर नेमके का वार केले, यामागे कोणता वाद, मानसिक तणाव किंवा इतर कारण आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर विविध तर्कवितर्क लावले जात असून नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे धार्मिक क्षेत्रात आणि भक्तवर्गात मोठी चर्चा रंगली असून सर्वजण महाराजांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत.
