Download App

भाजपचा ‘इलेक्शन’ बाण ! अयोध्येत पुजन झालेल्या ‘शिवधनुष्याची’ निघणार राज्यभर यात्रा

प्रफुल्ल साळुंखे

(विशेष प्रतिनिधी )

CM Eknath Shinde Ayodhya Tour : एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा होतो. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका आणि श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रचार प्रसिद्धीची भव्य तयारी सत्ताधारी भाजपने केली आहे. हा दौरा भव्य दिव्य असेल यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात राम मंदिर आणि शिवधनुष्य या दोन गोष्टींवर अधिकाधिक भर कसा राहिल याची तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर जातील. त्याठिकाणी राम मंदिराचे होणारे बांधकाम तयारी याची पाहणी केली जाणार आहे. ही पाहणी केल्यानंतर गंगा घाट येथे महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाईल. महाआरतीच्या आधी शिवधनुष्याचे पूजन केले जाणार आहे. पुजनानंतर हा दौरा संपणार आहे.

Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!

या दौऱ्यानंतर हे शिवधनुष्य महारष्ट्रात आणले जाणार आहे. यात भाजपच्यावतीने या शिवधनुष्याची यात्रा संपूर्ण राज्यात काढली जाणार आहे. जय श्रीरामाचे शिवधनुष्य या आशयाची शोभायात्रा प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त तालुक्यात आणि मतदारसंघात नेण्याची तयारी भाजपने केली आहे. राम मंदिराची संपूर्ण उभारणी ही जानेवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात राम मंदीर सर्व जनतेसाठी खुल होणार आहे. त्याआधी राम मंदिराच्या वातावरण निर्मितीसाठी शिवधनुष्य यात्रा अधिकाधिक प्रभावी करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एप्रिल महिन्याच्या शेवटी लोकसभा निवडणुका होतील या निवडणुकांच्या प्रचाराची एक पूर्वतयारी म्हणून या शिवधनुष्य यात्रेकडे पाहिले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यात भाजप थेट सहभागी होणार नाही. मात्र हे शिवधनुष्य महारष्ट्रात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात शोभायात्रा काढण्यासाठी नियोजन आणि प्रसिद्धी यात भाजप सक्रिय सहभागी होईल अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

Tags

follow us