Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!
प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)
CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याचा भरगच्च कार्यक्रम असलेले वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या खास अशा दौऱ्यासाठी विमानं सज्ज झाली असून, अयोध्येतील शक्ती प्रदर्शनासाठी आवश्यक कार्यकर्त्यांची टीम आज दुपारी मुंबईहून आयोध्येकडे मार्गस्थ होणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी भाजपची विशेष टीम सज्ज करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यात अलाहाबाद आयोध्या महाआरती, राम मंदिर, योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्नेहभोजन असा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आमदार खासदार विशेष विमानाने तर, मुख्यमंत्र्यांसाठी खासगी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, या दौऱ्याचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांसाठीदेखील विमानाची सोय करण्यात आली आहे.
अलाहाबाद येथे राहण्याची विशेष व्यवथा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा जरी हा दौरा असला तरी, त्यासाठी शासकिय निधीचा वापर होणार नाही. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या दौऱ्यावर आणि त्यासाठीच्या खर्चावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारीक लक्ष देत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे 8 तारखेला 5 वाजता मुंबईहून आयोध्येसाठी रवाना होणार आहेत.
दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमचे लक्ष
दरम्यान, अयोध्येचा हा दौरा जरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदारांचा असला तरी, हा दौरा भव्यदिव्य व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या दौऱ्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भाजपने विशेष टीम तयार केली आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन, मोहित कांबोज, आमदार संजय कुटे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक जणांचा या टीममध्ये सहभाग असणार आहे. ही टीम एकनाथ शिंदे यांच्या टीमच्या प्रत्येक बारीक घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.
उतर प्रदेश भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी आणि दौऱ्यादरम्यान काही अडचणी येऊ नये यासाठी भाजपची ही विशेष टीम काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मंदिरातील महाआरतीवेळी शिंदेंबरोबर एकत्र असतील. या विशेष टीमशिवाय या टीमला अतिरिक्त मदतीसाठी आवश्यक असणारी एक मॅनेजमेंट टीम आधीच आयोध्येला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2014 मध्ये राज ठाकरे यांच्या गुजरात दौऱ्याप्रमाणे हा दौरादेखील भव्य दिव्य असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.