Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल मीडियाबद्दल विविध कलमान्वये निर्बंधांचे आदेश जारी केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या आचारसंहितेदरम्यान, शांतता, निर्भय व न्यायपूर्ण वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यासाठी विविध कलमान्वये जिल्हा स्थरावर पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. दरम्यान, निवडणूक काळासाठी काढण्यात येणार्या मिरवणुकींसाठी पोलीस परवानगी बंधनकारक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
भाजपची दुसरी यादी केव्हा येणार? चंद्रकांत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
कोणत्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचं वा मेळाव्यांचं आयोजन करण्यावर निर्बंध राहणार आहेत. परिसरातील नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम अॅप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, डीप फेक, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. कोणाचेही विरोधात घोषणाबाजी, डीजे, फटाके, रंग, गुलाल उधळणार नाही किंवा वाजणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन जबाबदार
व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमिन यांनी 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत, जर अॅडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणार्या सदस्यासह ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.