Maharashtra Assembly Election 2024 : भाजपच्या टार्गेटवर कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही तुरुंगातून जाऊन आलो आहोत. भाजप बिश्नोई गॅंग असून त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज जागावाटपावरून सुद्धा माहिती दिली.
त्याचं मी पालन करणार
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे कोणाचं स्वतंत्र संस्थान नसल्याचा खोचक टोलाही काँग्रेसला लगावला आहे. बऱ्याच जागांवर चर्चा पूर्ण झाली असून काही जागांची चर्चा बाकी आहे. त्या संदर्भाने मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनीही काही सूचना दिल्या असून त्याचं मी पालन करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडमध्ये टाकला डाव; अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला?
बऱ्याच जागा संदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र, काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की मी काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही माझं बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा चर्चा पुढे सरकण्यासाठी बोलणी करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
विदर्भातील काही जागांवर वाद असल्याचा संजय राऊत यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे. ते म्हणाले की, आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावतीचीही जागा आम्ही दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा आम्ही दिल्या त्या जागांवर जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असंही राऊत यावेळी म्हणाले.
पक्षप्रवेश होणार
निवडणूक आयोगाच्या काही जाचक अटींविरोधात आम्ही त्यांना भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट यांनी कंले. आज शिवसेना ठाकरे गटामध्ये कोकणातून दीपक साळुंखे आणि राजन तेली यांचा पक्षप्रवेश होत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणखी काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले.