Maharashtra Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघांवर या निवडणुकीत कोण वर्चस्व राखणार यावर सध्यातरी पेच आहे. येत्या २३ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही निवडणूकही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होण्याची अधिक शक्यता आहे. कारण एक असलेला शिवसेना पक्ष आता दुभंगलेला आहे. त्यामुळे यातील दुभंगलेपणामुळे मतदार कोणत्या शिवसेनेकडे कौल देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नार्वेकरांच्या अमित शहांना शुभेच्छा! उद्धव ठाकरे अन् भाजप संघर्षाचा दाखला देत सोशल मीडियावर टीका
बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्याने छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला होताच. महापालिकेवरही सतत शिवसेनेचेच वर्चस्व राहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयआयच्या विजयाने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला. २०२० ला महापालिकेची मुदत संपली व तेव्हापासून तिथे प्रशासक राज आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडून भाजपला मिळाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील इथल्या शिवसेनेची पिछेहाटच झाल्याचं थोड चित्र आहे.
मध्य मध्ये काय स्थिती असणार?
छत्रपती संभाजीनगर मध्यमधून ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. इथे शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आमदार आहेत. छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून राजू शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तिथे शिंदेसेनेचे संजय शिरसाट आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना सिडको महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं. ठाकरेंवर टीका करण्यात ते आघाडीवर असतात. राजू शिंदे काही दिवसांपूर्वीच भाजपची साथ सोडून ठाकरेंकडे आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी शिरसाट यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवत ४३ हजारांहून अधिक मतं घेतली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दरम्यान, येथे मुस्लिम संख्या अधिक असल्याने एमआयएमही उमेदवाराची चाचपणी करत आहे.
पूर्वमधून अधिक उमेदवारांची शक्यता?
छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये सध्या भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत. ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते हे निश्चित नाही. तेथील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता महाविकास आघाडीचा उमेदवार मुस्लिम राहील का? याकडेही लक्ष आहे. एमआयएमसारखा पक्षही तेथून लढणारच आहे. पूर्व मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक राहू शकते. जातीय समीकरणं बिघडण्यासाठीही उमेदवार उभे राहतील किंवा केले जातील याचीही दाट शक्यता आहे.
पश्चिममध्ये काय होणार?
पश्चिममधून संजय शिरसाट यांची लढत महाविकास आघाडीतील उद्धवसेनेच्या उमेदवाराशीच होईल. या मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळणार आहे. ‘मध्य’चे आमदार प्रदीप जैस्वाल आहेत. आता ते शिंदेसेनेत आहेत. तेथे उद्धवसेना दावा करीत आहे. ही जागा सोडवून घेण्यासाठी काँग्रेसही प्रयत्नशील आहे. ती काँग्रेसला सुटल्यास तेथे मुस्लिम चेहरा दिला जाईल. या तीनही मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एखादी तरी जागा सुटते का, याचीही उत्सुकता आहे.