नार्वेकरांच्या अमित शहांना शुभेच्छा! उद्धव ठाकरे अन् भाजप संघर्षाचा दाखला देत सोशल मीडियावर टीका
Milind Narvekar Birthday wishes to Amit Shah : उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय युद्ध रंगणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे भाजपविरोधात लढताना दिसून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. दरम्यान, ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात टोकाचे वाद आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही नेत्यांकडून परस्परांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोदी-शाह यांच्यात समेट होण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी दृष्टीपथात नाही. अशी सगळी परिस्थिती असताना ठाकरे गटाचे विधानपरिषदचे आमदार, सचिव व उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी अमित शाह यांना एक्स पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माहीममधून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?, उद्धव ठाकरे 2019 ची परतफेड करणार का?
एकीकडे पक्ष अमित शहांच्या विरोधात लढत असताना नार्वेकरांनी दिलेल्या शुभेच्छांवरून कार्यकर्ते व नेते नाराज होण्याची शक्यता नाकारत येत नाही. कारण गेल्या काही महिन्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केलेली आहे. ही टीका नार्वेकर विसरले का? शुभेच्छा द्यायची एवढी घाई का, अशी कुजबुज आता ठाकरे गटात सुरु झाल्याची माहिती आहे. तसंच, हा निवडणुकीचा काळ असल्याने या चर्चेने अधिकच जोर धरला आहे. त्यातच काँग्रेस आणि ठाकरे गटात वाटाघाटी आणखी होत नसल्यानेही तर्क-वितर्क लावले जात आहेत.
उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसून आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मोदी-शाहांच्या भाजपचा उल्लेख ‘दिल्लीतून चालून येणारी अफजलखानाची फौज’, असा केला जातो. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अहमद शहा अब्दालीचा वंशजही म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर अशाप्रकारची टीका करुन भाजपशी आपली लढाई ‘आर या पारची’ असल्याचं दाखवून दिलं आहे. अशा परिस्थितीत मिलिंद नार्वेकर यांची कृती वादात सापडण्याची शक्यता आहे.
Warm birthday greetings to Union Home Minister Shri @AmitShah ji. pic.twitter.com/LIXFBtnsp6
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 21, 2024