भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन

भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन

Milind Narvekar Congrates Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात काल एक मोठी घडामोड घडली. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला त्यांना डावलण्यात आलं होतं. परंतु,आता त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. पण या शुभेच्छांतही विरोधी पक्षांतील विसंवाद ठळकपणे दिसून आला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ठाकरे गटातील दोन शिलेदारांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली.

भुजबळांना नार्वेकरांच्या शुभेच्छा

छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुणी प्रत्यक्ष भेटून तर कुणी सोशल मीडियातून पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत. यात विरोधी पक्षांचेही नेते आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मिलींद नार्वेकर यांनीही एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शपथ घेतानाचा भुजबळांचा फोटो नार्वेकरांनी शेअर केला आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल छगन भुजबळजी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असे ट्विट मिलींद नार्वेकर यांनी केलं आहे.

राऊतांचा भुजबळ, शिंदेंवर हल्लाबोल

तसं पाहिलं तर या ट्विटमध्ये विशेष काही नाही. कुणालाही शुभेच्छा देतो तसं साधं सरळ ट्विट आहे. पण यात काही अर्थ आहे. कारण आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीयमधून छगन भुजबळ आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं आहे. एकनाथ मिंधे (शिंदे) यांना यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वैगेर प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरेंना विचारत होते. मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शाहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसता येणार नाही हे मुख्य कारण होते.

शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शाह आणि फडणवीसांनी केली आहे की शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube