आजचा दिवस मानहानीच्या खटल्यांचा; राहुल गांधींसह राऊत, सावंत न्यायालयात

अनेक राजकीय नेत्यांच्या मानगुटीवर मानहानीच्या खटल्यांचं ओझ असल्याचं आज पाहायला मिळालं.

  • Written By: Published:
RR

आजचा दिवस राजकीय वर्तुळात चांगलाच गाजला आहे. (Raut) अनेक राजकीय नेत्यांच्या मानगुटीवर मानहानीच्या खटल्यांचं ओझ असल्याचं आज पाहायला मिळालं. आपला जामीनदार बदलण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर झाले, तर दुसऱ्या बाजूला मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील अब्रुनुकसानीचा वाद होता तो आज मिटवला गेला.

दुसरीकडं मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून शायना एन. सी यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात या तिन्ही घडामोडींची जोरदार चर्चा रंगली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबत ते कोर्टात आले होते.

त्यावेळच्या सभेत राहुल गांधी यांनी आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांचे जामीनदार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. मात्र, त्यांचं निधन झालं असल्याने नवीन जामीनदार सादर करायचा होता, यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी न्यायालयात राहुल गांधी यांचा जामीन स्वीकारला, त्यावर न्यायालयाने जामीनपत्र मंजूर केल्याने पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राऊत-भूसेंची दिलजमाई

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखलं केला होता. त्यावर आज यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याने भुसे यांनी तो खटला मागे घेतला. दोन्ही नेते न्यायालयात एकत्र पोहोचल्याचे दृश्यही चर्चेचा विषय ठरले. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं.

आमचे संबंध जुने आहेत. चुकीच्या माहितीवर हा वाद निर्माण झाला, अस राऊत यावेळी म्हणाले. तर दादा भुसे म्हणाले की, गिरणा साखर कारखान्याबाबत 178 कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, राऊत यांनी माफी मागितल्याने हा खटला मागं घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर आज मुंबईतील माझगाव न्यायालयात शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन.सी. हजर झाल्या. विधानसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांनी त्यांच्याबाबत ‘इंपोर्टेड माल’ असं वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याचा दावा करत शायना एन.सी. यांनी सावंत यांच्याविरोधात मानहानी आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी झाली असून आज शायना एनसी यांची साक्ष नोंदविण्यात आली.

follow us