राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी; राजस्थान पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
आरोपीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओ आता त्या अकाउंटवरून हटवण्यात आला आहे.
Threat to shoot 25 MPs including Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक कोटा येथून करण्यात आली असून आरोपीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओ आता त्या अकाउंटवरून हटवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राज सिंह नावाच्या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा आक्षेपार्ह आणि धमकीचा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेत तपास सुरू केला. अकाउंटचा मागोवा घेत आरोपी राज सिंहला कोटा येथून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत राज सिंहने स्वतःला करणी सेनेचा प्रवक्ता असल्याचे सांगितले. त्याने असा दावा केला की राहुल गांधी आणि इतर खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचा अपमान केला, त्या घटनेमुळे संतापून आपण हा व्हिडिओ पोस्ट केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, करणी सेनेकडून राज सिंहचा आणि त्यांच्या संघटनेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भिगवण प्रकरणात ट्विस्ट; अचानक तरुणी पोलीस ठाण्यात हजर; सांगितलं अहिल्यानगर कनेक्शन
या प्रकरणाबाबत कोटा येथील पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात कोटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 170 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सध्या पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून धमकी देण्यामागील नेमका उद्देश काय होता, तसेच यामध्ये इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.
