33 तासांच्या महाकोंडीनंतर पुन्हा तोच अनुभव; मुंबई-पुणे मार्ग ठप्प, खंडाळा बोगद्याजवळ लांबच लांब वाहनांच्या रांगा
गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सुट्टी असल्याने पुन्हा एकदा या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
Long queues of vehicles near Khandala tunnel : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच, 3 फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वर प्रवाशांना तब्बल 33 तासांच्या भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि हजारो प्रवासी आपल्या गाड्यांमध्ये अक्षरशः अडकून पडले होते. अन्न-पाण्याची गैरसोय, उष्णतेचा त्रास आणि वेळेचा प्रचंड अपव्यय यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. या कोंडीमागे खंडाळा घाट परिसरात सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाला कारणीभूत मानले जात आहे.
घाट विभागातील कामांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून त्याचा थेट परिणाम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर होत आहे. दरम्यान, गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सुट्टी असल्याने पुन्हा एकदा या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. विशेषतः मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अक्षरशः मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. पहाटेपासूनच कोंडीला सुरुवात झाली होती. खंडाळा बोगदा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच लोणावळा आणि खंडाळा परिसरात मुंबई व पुणे या दोन्ही दिशांना वाहतूक खोळंबलेली दिसून आली.
सुनील तटकरे विरुद्ध रोहित पवार भांडणात आमदार बापू पठारे यांचा विषय निघाला
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कोंडीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, उन्हाचा झळा, इंधनाची नासाडी आणि तासन्तास एकाच जागी थांबून राहण्याची वेळ यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. 3 फेब्रुवारीला झालेल्या महाकोंडीची आठवण ताजी झाल्याने पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवेल की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा घाटमार्गाला पर्याय म्हणून उभारला जात आहे.
खोपोली ते कुसगाव दरम्यानचा अवघड घाट रस्ता टाळण्यासाठी 13.3 किलोमीटर लांबीचा हा आधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ साधारण 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचे सांगितले जाते. सुमारे 6,695 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे सुमारे ६ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. या मार्गावर देशातील सर्वात रुंद आणि आधुनिक अशा दोन बोगद्यांचा समावेश आहे, त्यापैकी एक बोगदा 9 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा असेल.
तसेच टायगर व्हॅली परिसरात सुमारे 132 फूट उंचीचा देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात येत आहे. संपूर्ण मार्ग आठ पदरी असणार असून, भविष्यात मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुसह्य होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत, कामांच्या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील वारंवार होणारी वाहतूक कोंडी हीच प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
