Devendra Fadnavis : राज्यात अंमली पदार्थांचा धोका वाढला हे खरच आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. नवीन पुरवठा साखळी तयार झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. राज्यातील दहशतवाद विरोधी पथकालाच आता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अंमली पदार्थांबाबत प्रश्न उपस्थित केला. पवार म्हणाले, पुणे शहरात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हा फक्त पुणे शहराचाच नाही तर संपूर्ण राज्याचा हा प्रश्न असू शकतो. मे 2023 मध्ये सात कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केले. मागील पाच वर्षात मुंबई पोर्ट किंवा गुजरात पोर्ट या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले आहेत. युवा पिढी वाया चालली आहे. त्यामुळे या प्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, अंमली पदार्थांचा धोका वाढत चाललाय हे खरं आहे. यासाठी आता नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे. कुरिअरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. व्हॉट्सअॅप किंवा कुठल्या तरी सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून मेसेजेसच्या माध्यमातून कोड लँग्वेज वापरली जाते. अशी नवी पुरवठा साखळी तयार झाली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची बैठक झाली आहे.
राज्यात जे दहशतवाद विरोधी पथकाला नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. यासोबत एक अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी जिल्हा पातळीवर तयार करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांना या संदर्भात धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ही बैठकही दरवर्षी होत आहे. विदेशी नागरिकांनाही ओळखण्याचे काम केले जात आहे. त्यांच्यासाठी डिटेंशन सेंटर तयार करण्याचे काम सुरू आहे.
पोस्ट आणि कुरिअरच्या कार्यालयांचे सेंन्सटायजेशन केले आहे. कुरिअर कार्यालयांनाही काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. काही महत्वाची माहिती मिळाली तर कुरिअर कार्यालयांची तपासणीही केली जात आहे.