प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्यांवरून दिग्गज नेते मंडळी आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. परंतु, आज सभागृहात सर्वांचं लक्ष वेधलं ते काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी. ज्यावेळी अमित देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ते ज्या पद्धतीने बोलत होते. ते पाहून उपस्थितांना माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या शैलीची आठवण झाली.
विलासराव देशमुख त्यांच्या शांत आणि मीतभाषी संवादासाठी परिचित होते. याच पद्धतीने आज अमित देशमुख यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. अमित देशमुखांच्या बोलण्यात यावेळी कुठेही इतर नेत्यांप्रमाणे आक्रमकता नव्हती ते अगदी विनम्रतेने प्रश्न मांडत होते. यावेळी त्यांनी अनुदानाच्या मागण्यांसह जिल्ह्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच पर्यटनासंबंधी अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासह पर्यटनासंबंधी अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे यावेळी अमित देशुमख यांनी निदर्शनास आणून दिले.
ज्यावेळी अमित देशमुख विविध विषयांवर भाष्य करत होते, त्यावेळी त्यांची बोलण्याची शैली, हावभाव हाताची आणि शब्दांची लकब हे अगदी विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे होती ते पाहून सभागृहातील प्रत्येक सदस्याला नक्कीच विलासराव देशमुखांची आठवण झाली असेल. ज्याप्रमाणे विलासराव शांतपणे बोलायचे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे हजरजबाबीपणादेखील होता. हाच हजरजबाबीपणा आज अमित देशमुखांमध्येही पाहण्यास मिळाला. त्यांचा हा गुण पाहून उपस्थितांनी त्यांची पाठ थोपटली.
कोकणातल्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा डाव; राऊतांच्या आरोपाने खळबळ
विविध मुद्यांवर बोलत असताना अमित देशमुख म्हणाले की, “अनेक प्रश्न प्रलांबित आहे. सरकार डगमाळीत आहे. पुढच्या तारखेला सरकारचे काय होईल माहित नाही” त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेले औसाचे आमदार अभिमन्यू पवार मध्येच बोलले. “अमितजी तुम्ही काळजी करू नका, निर्णय चांगलाच लागेल.” त्यावर वडिलांप्रमाणे हजरजबाबीपणा दाखवत उत्तर दिले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय काय लागेल हे तुम्हालाच (भाजप) जास्त माहिती असेल. त्यांच्या या उत्तराने एकच हशा पिकला त्याचवेळी सभागृह अध्यक्षांनी वेळ संपल्याची बेल वाजवली.
मात्र, एवढ्यावरच थांबतील ते अमित देशमुख कसले. खाली बसता बसता अमित देशमुख यांनी “कहिसे शुरू हो बाते खत्म मस्कुराहट से होनी चाहीये अशा शायराना अंदाजात आपल्या मुद्यांचा शेवट केला. त्यांची ही शायरी म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी, संस्ंथावर सुरु असलेली कारवाई आणि सरकार आणि विरोधक यांच्यातील निधी वाटपाचे युद्ध या सर्वांसाठी ही शायरी होती का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=3vfNaAr-i4Q