Badlapur Crime : बदलापुरातील नामांकित शाळेतील चिमुकलींवरील (Badlapur Crime) अत्याचाराच्या घटनेनं राज्यच हादरलं आहे. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. आता राज्य बालहक्क आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पॉक्सोसारख्या केसमध्ये तत्काळ गुन्हा दाखल करावाच लागतो. तेथे चौकशीचा काहीच प्रश्न नसतो. तरी देखील पोलीस चौकशी करत होते आणि तब्बल 11 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या मते येथेच खरी समस्या होती. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करायलाच हवा होता. शाळा व्यवस्थापनानेही या प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना द्यायला हवी होती, अशी टिप्पणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी केली.
बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. बदलापुरातील घटनेवर त्यांनी पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहा पुढे म्हणाल्या, 11 तासांनंतर गुन्हा दाखल झाला येथेच खरी समस्या आहे. शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला सांगितलं. आता त्याच दिवशी सांगितलं की 16 तारखेला सांगितलं हा प्रश्न आहे. त्यांच्याकडून फक्त सारवासारवच चालली होती.
मला ज्यावेळी कळलं त्यावेळी आमचे कर्मचारी पालकांबरोबर लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. पॉक्सो केसमध्ये तत्काळ गुन्हा दाखल केला जातो तेथे चौकशीचा काही प्रश्नच नसतो. पण पोलिसांकडून चौकशी केली जात होती आणि तब्बल 11 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हीच खरी समस्या होती. या घटनेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करायलाच हवा होता, असे शहा म्हणाल्या.
आताचं राज्य सरकार नक्कीच संवेदनशील आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात कठोर कारवाई होईलच असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. मुळात तो जो माणूस होता तो पंधरा दिवस त्या शाळेत वावरत होता. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचाऱ्याला कसा प्रवेश दिला गेला? कर्मचाऱ्यांची पार्श्वभुमी न तपासता कसं तुम्ही कंत्राट देऊ शकता? ठाण्यात अशीच घटना घडली होती त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत मुलं शाळेत आहेत आणि शाळेच्या गणवेशात असतील तोपर्यंत त्या मुलांची जबाबदारी शाळेचीच आहे.
शालेय शिक्षण विभाग राज्यांतील शाळांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. जवळपास दोन कोटी मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. सगळ्यांनीच आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे असेही राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शहा यांनी स्पष्ट केलं.
मोठी बातमी : शाळेतील प्रत्येकाचे पोलीस वेरिफिकेशन करा; बदलापूर घटनेनंतर सरकारचे आदेश