Download App

बाळासाहेब थोरातांनी हेरला भाजपचा प्लॅन; कार्यकर्त्यांना सांगितले सावध राहा..

Balasaheb Thorat : राज्यात पुन्हा आपलेच सरकार येणार आहे. तसे आताच स्पष्ट दिसत आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहणे जास्त गरजेचे आहे. आपण एकत्र राहिल्यास लोकसभेच्या 38 तर विधानसभेच्या 180 जागा जिंकू शकतो. ग्रामीण भागात भाजप कुठेही नाही. कारण, येथील हित त्यांच्या अजेंड्यातच नाही. मात्र आता ते प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध रहावे लागेल असा इशारा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. काल मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आ. छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण उपस्थित होते.

थोरात यांनी मंत्री असतानाचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, मंत्री असताना मी नगर ते लातूर असा प्रवास केला. प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वागत करत होते. त्यावेळी मी सहजच त्यांना प्रश्न विचारायचो येथे भाजप नाही का रे, त्यांच्याकडून नाही असे उत्तर यायचे. मग मी विचारले खासदार कसा निवडून आणला तर त्यांनी सांगितले की लोकांनीच निवडून दिला.

हे वाचा : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा; छगन भुजबळ

म्हणजे याचा अर्थ असा की ग्रामीण भागात भाजप कुठेच नाही. भाजप ग्रामीण भागात असूच शकत नाही कारण हा भाग त्यांच्या अजेंड्यातच नाही. पण आता ते ही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याला सावध रहावे लागेल असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की आघाडीचे सरकार कसे आले हे सर्वांना माहिती आहे. तीन पक्षांना एकत्र आणून सरकार आणले. उद्धव ठाकरेंनी जे काम केले ते उल्लेखनीय होते. त्यानंतर कोरोना आला. कठीण परिस्थिती होती. या सगळ्या काळात विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. या संकटात ठाकरेंनी जे काम केले त्याचे कौतुक जगात झाले. आजही त्यांच्याच कामाचा उल्लेख होतो.

उद्धव ठाकरे यांच्या एका सभेने भाजप घाबरले : नाना पटोले यांचा दावा

कोरोना संकटात अडचणी आमच्याही पुढे होत्या. पण म्हणून आम्ही आकडे लपवले नाहीत. बाकी ठिकाणी गंगेत मृतदेह वाहत असल्याचे आपण पाहिले. पण आपण काहीच लपवले नाही. सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफी केली.

या अगोदरही कर्जमाफी झाली होती. 65 रकान्यांचा अर्ज त्यावेळी होता. पण आम्ही कोणताही छळ न करता शेतकऱ्यांना मदत केली. कोकणातील नैसर्गिक आपत्तीत चांगले काम केल्याचे थोरात म्हणाले.

नुकताच एक स्वतंत्र सर्वे आला होता. त्यात असे म्हटले होते की जर महाविकास आघाडी एकत्र राहिली तर लोकसभेच्या 34 जागा निवडून येतील. यानंतर आपल्याकडून एक सर्वे केला गेला त्यामध्ये हा आकडा 38 पर्यंत वाढला. त्यामुळे जनतेला आपलेच सरकार पुन्हा पाहिजे हे स्पष्टच दिसत आहे. फक्त तुम्ही सगळे नीट रहा म्हणजे सगळे ठीक होईल, असेच लोकांना वाटत असल्याचे थोरात म्हणाले.

दादा म्हणजे रणगाडा

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेने सगळेच हादरले आहेत. आता पुण्यात सभा होणार असून ही सभाही अशीच जोरदार होणार आहे. कारण या सभेची जबाबदारी अजित पवार यांनी घेतली आहे. दादा म्हणजे आपला रणगाडा आहेत असे थोरात यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

Tags

follow us