Download App

‘बावनकुळे म्हणजे कंस मामा, आता त्यांनी रावणाचं रुप घेतलं’; भाच्यानेच केली आगपाखड

Jaykumar Belakhade criticized Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात नात्यातील राजकारण चांगलेच प्रसिद्ध आहेत. कधी पुतण्या आणि काका विरोधात असतात तर कधी बाप अन् बेटा. आताही राजकारणात अचानक मामा आणि भाच्याची जोडी चर्चेत आली आहे. ही जोडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि त्यांचे भाचे जयकुमार बेलाखडे (Jaykumar Belakhade) यांची.

बावनकुळे यांचे भाचे बेलाखडे यांनी बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. बेलाखडे यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील तीन हजार नागरिकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घडवले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली.

परभणी : भाजपचे ‘कमळ’ कोमेजणार? राष्ट्रवादीचा ‘गजर’ अन् काँग्रेस, ठाकरेंनाही मिळणार दिलासा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंस मामा आहेत. सध्या त्यांनी रावणाचं रुप घेतलं आहे. भाजपच्या 108 माळेच्या मण्यांमधील ते एक मणी आहेत. आमच्या मामाला काही कळत नाही, अशा शब्दांत बेलाखडे यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यानंतर त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका केली.

बेलाखडे आधी भाजपमध्ये होते. आता मात्र त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. बेलाखडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघात फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. मामा पक्षाचे अध्यक्ष असतानाही तिकीट मिळू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर बेलाखडे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

Tags

follow us