परभणी : भाजपचे ‘कमळ’ कोमेजणार? राष्ट्रवादीचा ‘गजर’ अन् काँग्रेस, ठाकरेंनाही मिळणार दिलासा
News Arena India Survey :
परभणी: जिल्ह्यातील भाजपच्या एकमेव आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणामध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. बोर्डीकर आणि गुट्टे यांच्या जागी राष्ट्रवादीचे विजय भांबळे आणि मधुसूदन केंद्रेकर हे निवडून येणार आहेत, असा दावा या सर्वेक्षणाच्या माध्यामातून केला आहे. (News Arena India Survey Parabhani district Meghana Bordikar and Ratnakar Gutte)
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 2019 मध्ये इथून शिवसेनेच्या तिकीटावर संजय जाधव हे खासदार म्हणून तर राहुल पाटील हे आमदार म्हणून निवडून आले. पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देखील हे दोन्ही नेते ठाकरेंसोबत कायम राहिले. आता ‘न्यूज एरिना इंडिया’ च्या सर्व्हेक्षणानुसारही 2024 रोजी राहुल पाटील पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून येतील असं सांगितलं जात आहे.
News Arena India Survey : भुजबळ, झिरवळांचे गड मजबूत, कांदेंना धक्का; नाशकात राष्ट्रवादी भाजपला वरचढ?
तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2014 ला राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे निवडून आले होते.मात्र 2019 मध्ये नाट्यमयरित्या युतीच्या दोन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीमध्ये शिवसेनेच्या विशाल कदम यांना पराभूत करत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे निवडून आले. तर केंद्रे थेट सहाव्या स्थानावर फेकले गेले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार सीताराम घनदाट यांनी निर्णायक मत घेतली होती. आता घनदाट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. या सर्व्हेनुसार 2024 मध्ये गंगाखेड येथून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मात्र घनदाट की केंद्रे यापैकी कोण उमेदवार असू शकतो हे निवडणुकीत कळून येणार आहे.
News Arena India Survey : जळगाव भाजपचच! पण, एकनाथ खडसेंसाठीही गुडन्यूज
पाथरीतून माजी मंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर हे त्यांचा गड कायम राखू शकतात, असा अंदाज आहे. तर सर्व्हेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिंतुरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा पराभव होऊन इथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांचा पराभव झाला होता. मात्र आता या सर्व्हेनुसार आगामी निवडणुकीत भांबळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.