ठरलं! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचा महापौर तर शिंदे गटाचा उपमहापौर

सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 06T125142.356

गेली अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण होणार याची चर्चा सुरू होती. अखेर या प्रश्नावर पडदा पडला आहे. समर्थनगर प्रभागाचे नगरसेवक समीर राजूरकर यांच्या नावावर महापौर पदासाठी शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने आता निवडीची औपचारिकात बाकी आहे. शहराचे महापौरपद ‘खुलं’ (सर्वसाधारण) जाहीर झाल्याने अनेक नावे पुढे आली होती. मात्र, भाजपने प्रदीर्घ चर्चा करून आपला पत्ता उघड केला आहे.

वेगवान राजकीय घडामोडी

आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्ये महापौर पदासाठी चुरस वाढली होती. दरम्यान, स्थानिक कोअर कमिटीच्या अनेक बैठकांमधून प्रामुख्याने चार नावांची चर्चा होती. मात्र, एकवाक्यता होत नसल्याने निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वावर सोपविण्यात आला. त्यानंतर आज भाजपच्या गोटातून एक नाव समोर आले. दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले समीर राजूरकर यांच्या नावावर एकमत झालं. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी या निवडीला दुजोरा दिला आहे.

सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. राजुरकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. ११५ सदस्यीय महानगरपालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ५८ मतांची आवश्यकता असताना, भाजप आता सर्वात मोठा पक्ष म्हणून शहराचा कारभार हाती घेणार आहे. राजूरकर यांच्या निवडीमुळे भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, आता औपचारिक निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौर

गजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),
सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),
किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),
विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),
त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)
भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

follow us