नवनिर्वाचितांचे सत्कारच संपले नसताना छत्रपती संभाजीनगर मनपातील १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे १८ नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 04T144610.249

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक अजूनही हारतुरे, (Sambhajinagar) सत्कार स्वीकारण्यातच मग्न असतानाच तब्बल १८ जणांविरुद्ध विरोधकांनी महापालिका प्रशासनाकडं तक्रारी केल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एमआयएम नगरसेवकांच्या विरोधात आहेत. प्रशासन या तक्रारींची शहानिशा करीत आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांची ‘कुंडली’ गोळा करण्यास विरोधकांनी दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली. ही माहिती गोळा करणाऱ्या एकाला बेदम मारहाण केल्याची घटनाही बीड बायपासवर घडली. राजकीय पक्ष एखाद्याला उमेदवारी देण्यापूर्वीच जात प्रमाणपत्र, तीन अपत्ये, अतिक्रमण इ. मुद्यांवर चौकशी करतात. एका राजकीय पक्षाने यासंदर्भात सखोल चौकशीच केली नाही. त्याचे परिणाम आता दिसत आहेत.

बीडमधील गंभीर घटना! पैशांवरून वाद, तरुणाने जिवलग मित्राची केली हत्या

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे १८ नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशी अहवाल आयुक्तांकडं सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्त यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असंही या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. कलम १० व १२ अंतर्गत संबंधित नगरसेवक उल्लंघन करीत असल्याचं स्पष्ट झालं तर अपात्रतेची कारवाई होईल. प्राप्त तक्रारींमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, शपथपत्रात संपती लपविली, खोटी माहिती दिली अशा तक्रारी आहेत असं मनपा आयुक्त जी श्रीकांत म्हणाले आहेत.

follow us