MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या वाढली
MPSC Group C Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा करत अनेक विद्यार्थांना दिलासा दिला आहे. आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील .
MPSC Group C Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा करत अनेक विद्यार्थांना दिलासा दिला आहे. आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा 16 हजार 717 पदांसाठी होणार आहे. सुरुवातीला आयोगाने 2 हजार 519 पदांसाठी 25 जून रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती मात्र आता यात आयोगाने मोठा बदल करत अनेक विद्यार्थांना दिलासा दिला आहे. आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळांना याबाबत ग्वाही दिली होती.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता उमेदवारांना नव्याने अर्ज व विकल्प सादर करण्याची संधी देखील मिळणार आहे. याचबरोबर राज्य शासनाने उच्च स्तरीय समितीच्या शिफारशींनुसार कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची शिथिलता दिली आहे. ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार होती मात्र आता ही परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी आयोजित केली जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देम्यात आली आहे.
कोण होणार करोडपतीच्या दिवाळी स्पेशल भागात रविना-माधुरीचे मजेशीर किस्से-
MPSC गट-क भरती 2026 : अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क भरती 2026 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी MPSCच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणीपासून अर्ज सादर करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
1. सर्वप्रथम MPSCच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. नवीन उमेदवार असल्यास नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
3. लॉगिन करून वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरा.
4. मागणीनुसार आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
5. उपलब्ध पदांपैकी पात्र असलेले पद आणि परीक्षा केंद्र निवडा.
6. लागू असलेले परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
7. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून अर्ज अंतिमरित्या सादर करा.
8. अर्ज सादर केल्यानंतर पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करून त्याची प्रिंट किंवा डिजिटल प्रत जतन करून ठेवा.
आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी काय करावे?
यापूर्वी MPSC गट-क भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सुधारित अधिसूचना काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. सुधारित अधिसूचनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पदांसाठी आपली पात्रता तपासावी.
नवीन पदांसाठी पात्र ठरत असल्यास उमेदवारांनी आपल्या खात्यातील ‘Recheck Eligibility’ हा पर्याय वापरून संबंधित पदांसाठी आवश्यक विकल्प सादर करावेत. त्यामुळे आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सुधारित अधिसूचनेतील पदे, पात्रता आणि अर्जासंदर्भातील सूचना तपासल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.