Maharashtra Politics : सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) सहभागी आहेत. तरीदेखील या सरकारला महायुतीचे सरकार म्हटले जात आहे यावरून काँग्रेसने (Congress) या सरकारची खिल्ली उडविली आहे. या संदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी अंदाज अपना अपना या हिंदी सिनेमातला एक सीन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
या सीनमध्ये असे दिसत आहे, की अमिर खान, सलमान खान आणि परेश रावल एकाच लुनावरून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान आणि सलमान खान म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट असे दाखविण्यात आले आहे. तर परेश रावल म्हणजे भाजपा असे आहे. आमिर खान आणि सलमान खान लुनावर बसलेले असतात तर परेश रावलसाठी जागाच नसते. मागे बसा, पुढे बसा असे दोघे सांगताना दिसतात.
शिंदे+ फडणवीस + अजितदादा यांच्या "तीन तिगाडा काम बिगाडा" सरकारची अवस्था …..
आणि भाजपा ची गरज सरल्यानंतरची शिंदे गट व अजित पवार गटाची अवस्था …… 😂😂 pic.twitter.com/ZZJf4BaSvA
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 18, 2023
शेवटी परेश रावल चिडतो आणि दोघांनाही खाली उतरवतो. आणि स्वतः लुनावर बसतो. त्यानंतर मात्र आमिर आणि सलमान खान कसेतरी लुनावर बसतात. मात्र परेश रावल लुना घेऊन निघून जातो दोघे मात्र मागेच राहतात. या प्रसंगावरून आताच्या तिघांच्या सरकारचीही अशीच अवस्था झाली आहे, असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे.
मागील 2 जुलै रोजी अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले. यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सध्या महाविकास आघाडीत काँग्रेसचे आमदार सर्वाधिक आहेत. राज्य सरकारवर टीका करण्यातही काँग्रेसचे नेते आघाडीवर असतात. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार रोजच काहीतरी गौप्यस्फोट करत आहेत. त्यानंतर आता सावंत यांनी हिंदी सिनेमाच्या माध्यमातून सरकारची खिल्ली उडविली आहे. आता यानंतर सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर! म्हणाले, ‘देवाने भक्ताला मनातून काढलं पण..,’