उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून

सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता.

  • Written By: Published:
Untitled Design 4

Uddhav Thackeray’s path to the Legislative Council : उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत असून, त्यांच्या पुनर्निवडीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सध्याच्या घडीला महाविकास आघाडीसमोर असलेले संख्याबळाचे आव्हान आणि येत्या काही आठवड्यांत होणाऱ्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांचे बदलते गणित, यामुळे ठाकरेंचा पुढचा राजकीय मार्ग नेमका कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मताला मोठे महत्त्व असणार असून, याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाकडे सध्या सुमारे 20 आमदारांचे संख्याबळ असून, हे आमदार जर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांना पाठिंबा देतात, तर त्याच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मे महिन्यात विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी साधारण 29 मतांचा कोटा आवश्यक असतो. मात्र सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे हा कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीतील ‘देवाणघेवाण’ हे सूत्र ठाकरे गटासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व

याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही राज्यसभेची जागा रिक्त होत आहे. पवार यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यासाठी जर ठाकरे गटाचा पाठिंबा निर्णायक ठरला, तर त्याबदल्यात विधान परिषदेतील एक जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी खुली होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत चर्चा, समन्वय आणि रणनीती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

एकीकडे भाजप आणि महायुतीकडून संख्याबळाचा दबाव वाढत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील परस्परावलंबन अधिक स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील पुनर्निवड ही केवळ एका नेत्याची निवडणूक नसून, ती महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकीय दिशा आणि एकजुटीची कसोटी ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यातील या निवडणुका राज्याच्या राजकारणात मोठे वळण देणार, यात शंका नाही.

follow us