Download App

अजितदादांनी चूक मान्य का केली? विधानसभेसाठी रणनीती की वेगळं काही…

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरच्या दोन महिन्यांत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. अजितदादांचा मूड आता बदललेला दिसतोय.

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरच्या दोन महिन्यांत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा (Ajit Pawar) मूडही आता बऱ्यापैकी बदललेला दिसत आहे. आता पुढील दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा अजित पवार मतदारांशी ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांच्याकडून वेगळी रणनीती आखली जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही एक चूक होती असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी जवळपास १.५८ लाख मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.

मागील वर्षात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. पक्षातील अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. या नेत्यांनी पुढे महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या सरकारमध्ये अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. तसेच आणखी काही आमदारांना मंत्रिपदे मिळाली.

पुण्यात नवा ट्विस्ट! आठ मतदारसंघाचा अहवाल जरांगेंनी मागवला; 29 ऑगस्टला मोठी घोषणा?

काका-पुतण्या वादाचा अजितदादांना फटका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रांगल्याचे दिसून आले होते. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं असा सल्लाही अजित पवार यांनी शरद पवारांना दिला होता. याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील जुन्या गोष्टी बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही एक पुस्तक लिहून अनेक गुपिते उघड करण्याचा इशारा दिला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजितदादांची बाजू घेत अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न शरद पवारांना विचारला होता.

यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे काका शरद पवार यांच्या बरोबरील वादात आपल्याला काहीच फायदा झाला नाही उलट मतदारांची जास्त सहानुभूती मिळाली याची जाणीव अजित पवारांना उशिरा का होईना झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी सुप्रिया सुळे यांनाच साथ दिली. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी मैदानात उतरून प्रचार देखील केला.

लोकसभेत महायुतीला झटका

लोकसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्या महायुतीला जोरदार झटका बसला. महाविकास आघाडीने मात्र दमदार कामगिरी करत अनेक मतदारसंघ युतीकडून अक्षरशः हिसकावून घेतले. महायुतीत सर्वात खराब कामगिरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची राहिली. आता जेव्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा अजित पवार डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शरद पवार गटाच्या एका नेत्याने सांगितले की अजित पवार यांनी शरद पवारांना धोका दिला आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या या निर्णयाचे मतदारांनी मात्र समर्थन केले नाही. लोकसभा निवडणुकीत ही गोष्ट स्पष्टपणे दिसून आली. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही त्यांची मोठी चूक होती. आता ही गोष्ट स्वीकारून अजित पवार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना बारामती मतदारसंघात पुतण्या युगेंद्र पवार विरोधात लढावे लागण्याची शक्यता आहे. अजित पवार सन १९९१ पासून सलग सात वेळा बारामतीमधून विजयी झाले आहेत. परंतु २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. सुळेंना विजयी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा जवळपास दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता.

आता निर्णय शरद पवारांना घ्यायचाय..

या विजयानंतर उत्साह वाढलेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबात राजकीय लढाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु अजित पवार यांनी लोकसभेत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात चूक झाल्याचे मान्य करत गुगली टाकली आहे. आता शरद पवार यांना निर्णय घ्यायचा आहे की त्यांना पवार कुटुंबात आणखी एक राजकीय लढाई होऊ द्यायची की नाही असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

follow us